Copyright © 2014 manatale gupit . Powered by Blogger.

Sunday, 17 January 2016

कधी कधी…

शांत निळाशार समुद्र, पायाला गुदगुल्या  करणारी ती मऊशार रेती, नारळाच्या पोफळीच्या बागा आणि अल्लडपणे थोडा बेभान वाहणारा वारा. अचानक कोठूनसा एक काळा ढग पाऊस घेऊन येतो आणि हळू हळू गरम झालेली ती रेती न्हाऊन निघते. आणि हो मी देखील! मी सर्वांग भिजून जाते पण तरी पण मी कोरडीच असते. 
का असे?
हाथ पसरून तो सारा पाऊस कवेत घेऊ पाहते, वाटते आता तरी मन भरेल….  पण नाही! 
नाही भरले मन…. 
पावसाचा जोर वाढू लागतो. माझी पावले घराकडे वळू लागतात. पावसाचा जोर चांगलाच वाढल्याने सगळे आडोसा धरून बसले होते. पण मी त्या पावसाला झेलत रस्त्यावरून जात होते. अंगावरून वाहण्याऱ्या प्रत्येक थेंबाक्षणिक सारे काही वाहून जाईल या अपेक्षेने. 
हळू हळू मी घराजवळ आले. दाराकडे पहिले…. नेहमी सारखेच होते अवजड कुलूप पांघरून बसलेले!
कुलूप उघडून आत आले. दिवा लावण्यासाठी बटण दाबले ,पण नाही…. पाऊस आल्यावर होणारी ती नेहमीची बोंब! असेही दिवा लावून जो प्रकाश हवा आहे तो थोडीच मिळणार आहे
कपडे बदलून मी डोके पुसत ओसरीवर अथांग कोसळणारा पाऊस बघत बसले. मनात एक विचार आला या पावसाचे बरे असते मोकळे ढाकळे होईपर्यंत रडू वाटत असेल तर रडून घेतो पण ज्यांचे रडू आटले असेल त्यांनी काय करावे?  पण का जाणे या पावसाचे रडू बघून मला थोडे हलके वाटले. 
पहाटे कधी तरी पावसाचे रडू थांबले. रडून रडून थकला असेल बिचारा. सकाळची आन्हिक आटोपली आणि निघाले मारिया ऑन्टीचा बेकरीमध्ये. म्हातारी आहे थोडी खाष्ट पण माझा बाबतीत खूप गोड आहे. मला काय लागते, काय लागत नाही सगळी काळजी असते तिला. ती म्हणते तू माझी अॅना आहेस. आईसिंग शुगर सारखी गोड! तिला मी गोड का 
वाटते देवच जाणो.
बेकरीमध्ये गेल्या गेल्या मारिया ऑन्टीने माझ्या आवडीचा प्लम केक पुढे करत म्हणाली, "अगं बाळ आणि बाळंतीन सुखरूप आहेत. मंदीला काल चार पोरं झाली, एक मुलगी आणि बाकी मुले जा जा बघून ये तू. पण जरा लांबूनच बघ हां मंदाकिनी जवळ येउन द्यायची नाही एवढ्यात." मंदाकिनी ऑन्टीची परशियन पांढरी शुभ्र मांजर आहे. ऑन्टीला जुनी पक्की मराठी style मधली नावे खूप आवडतात म्हणून मांजरीचे नाव मंदाकिनी! एक पोपट आहे त्याचे राघव नाव. असेच कधी तरी एक वासरू तिचा दारी आले, बिचारे भेदरलेले होते मोठ्या मायेने त्याला जवळ घेतले, शांत केले. आता तेच वासरू सखू म्हणून दुभती गाय तिचा दाराशी असते. म्हातारीचा हातात जादू आहे. सगळी जनावरे शहाण्या मुला सारखी वागतात तिचा हाताखाली. 
रोज सकाळी बेकरी मध्ये जायचे. बेकरी सांभाळायची, संध्याकाळी beach वर जायचे आणि बंद घराचे स्वताः दार उघडून आत यायचे. हेच तर आहे माझे routine. दोन वर्षांपूर्वी मीच स्वीकारलेले. मग मला अजून का स्वस्थ वाटत नाहीये? का अजून काही तरी मागे राहिले आहे असे वाटते? सगळे तर सोडून आलीये मी. अगदी नावासहित!
पण माहिती नाही अजूनही काही तरी मागे राहिले आहे असेच वाटते. पण काय माहिती नाही !